वंचितचं संचित

२०१४ ह्या वर्षात भारतात जीएसएटी 14 हा उपग्रह, अग्नी मिसाईल, मंगळयान, माळीन दुर्घटना, आंध्रप्रदेशची विभागणी, उरी हल्ला, कॉमनवेल्थ गेम्स, इबोला रोग आणि वाजपेयींना भारतरत्न अशा विविध अंगी घटना घडल्या. पण  २०१४ म्हटलं की पहिली छटा ज्यांची येते ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि निसंदिग्धपणे यायला पण हवी. कारण, एकविसाव्या शतकातील भारतीय राजकारण खऱ्या अर्थाने ढवळून काढणारे हेच ते वर्ष ज्यात 'मोदी' नावाच्या वादळाने भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्र पक्षांना तीनशेहून अधिक जागा मिळवून दिल्या होत्या. आता ह्या वादळात राजकीय विरोधकांची धुळदान साहजिक होती. सव्वाशे वर्षं जुना काँग्रेस अवघ्या ४४ लोकसभा क्षेत्रात आपलं अस्तित्व राखू शकला.सपा, बसपा, राजद,तृणमूल, राषट्रवादी काँगेस, डी एम के वगैरे आपलं नावापुरता यश मिळवता आलं. याचाच अर्थ विरोधकांना नाकारून जनतेने मोदींना निवडलं होतं.मोदीसुद्धा आपली ५६ इंचाची छाती आणि त्यावर लाखमोलाचा कोट चढवून नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर यांसारखे बरेच तडाखेबाज निर्णय घेत होते (तूर्तास या निर्णयातील बरकाव्यात न गेलेलंच बरं).

विरोधकांमध्ये अाधीच एकीचा अभाव त्यात मोदींची ही घोडदौड भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी देणारी ठरली व विरोधकांची अस्वस्थता आणखी वाढवणारी. गेल्या पाच वर्षात भारतातील प्रत्येक राज्यात हर तऱ्हेचे राजकीय प्रयोग झाले.तर्क संगतीचा धडा अख्या भाराताला ज्या राज्याने दिला त्या महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली नसती तरच नवल. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे एकत्र आले आणि त्यातूनच तयार झाली 'वंचित बहुजन आघाडी'.(वाचक म्हणतील आला बाबा हा एकदा मूळ मुद्द्यावर).

असो, तर वंचित आणि बहुजन म्हणजे नेमके कोण?

जो मानवी व्यवस्थेच्या मूळ प्रवाहापासून अलिप्त आहे तो वंचित गणला जाऊ शकतो. काळानुरूप याची व्याख्या करत असताना ती आर्थिक,सामाजिक  आणि राजकीय अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर करावी लागेल. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा झालेला विषम विकास.याचा दाखला हवा असेल तर मुंबई ते कोल्हापूर या चौपदरी रस्त्यावरून एकदा चक्कर मारावी व ती पूर्ण झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राची सुद्धा परिक्रमा करावी. कुणाला हे ही वाटू शकतं की भौतिक विकास म्हणजेच फक्तविकास असतो का? नाही, नक्कीच नाही पण वैज्ञानिक प्रगती सुद्धा भौतिक सुखाशिवाय होत नाही. गेल्या साठ वर्षात महाराष्ट्र बरेच भौतिक आणिभौगोलिक असे दोन्ही बदल होत गेले. या प्रक्रियेत महाराष्ट्राच्या जातिव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होतच गेला.आरक्षणामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला प्राथमिक स्वरूपात का होईना प्रत्येक जाती जमाती तल्या लोकप्रतिनिधींना स्थानद्यावंच लागलं. काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे, बॅरिस्टर ए आर अंतुले यांना मुख्यमंत्री बनवलं,शिवसेनेने नासिर शेख यांना कामगार मंत्री बनवलं, भाजपने सुद्धा गोपीनाथ मुंडेंसारखा लढवय्या नेता व आता रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवलं. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. त्यामुळे जी प्रक्रिया गेल्या साठ-सत्तर वर्षे चालत आहे तीच प्रक्रिया वंचित बहुजन आघाडी पुन्हा मांडू पाहत आहे. आता एखाद्याने पक्ष स्थापन करावा व तो चालवावा यात गैर काहीच नाही पण पक्षाचे तत्व मानवी गुणधर्माशी सुसंगत आहे की नाही हे पहावं लागेल. याचा  तर्क संगतीशी समेट घालायचा असल्यास २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमध्ये आपल्याला पहायला मिळेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार  गोपीचंद पडळकर यांना सर्वात जास्त मते मिळाली. त्यांना तब्बल तीन लाखांहून अधिक मते मिळाली. प्राथमिक स्वरूपात ते धनगर समाजाचे नेते असे मानले जातात. प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर लोकसभेमध्ये दोन लाखापेक्षा कमी मते मिळाली. औरंगाबादचे  उमेदवार इम्तियाज जलील हे मात्र विजयी झाले. उदाहरणादाखल ह्या तीन मतदारसंघाचा मागोवा घेऊया. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली त्यांनीही ती सार्थ ठरवत भरघोस मतेही घेतली. पण खरा प्रश्न हा आहे की गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली म्हणून महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांमध्ये धनगर समाजाने वंचित बहुजन आघाडी ला मते दिली का? याचं उत्तर सर्वश्रुत आहे. सोलापूर मतदरसंघात प्रकाश आंबेडकर यांना दोन लाखांहून कमी मते मिळाली. स्वतःच्या पराभवाचं खापर त्यांनी मुस्लीम मतदारांवर फोडलं. पण वास्तव हेच आहे का आणि एवढेच आहे का? जर असच असेल तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचितचे  उमेदवार यांना फक्त १,२०,००० मतेच मिळाली. या मतदासंघात मुस्लिम मते सव्वा तीन लाखांहून अधिक आहेत व जवळपास दोन लाख दलीत मते आहेत.

पण मग इम्तियाज जलील कसे काय निवडून आले?...
कारण आहे आर्थिक विषमता आणि त्याचा थेट परिणाम होतो समाजव्यवस्थेवर. मुस्लिम समाज हा गावकोसाबाहेर राहिला नाही पण तो सुरक्षित आहे असही नाही. कोंढवा, औरंगाबाद, हैदराबाद मधला मुस्लिम आणि कोल्हापूरमधील(हातकणंगले लोकसभेचा संदर्भ)मुस्लिम, पुण्यातले पेठेतील ब्राह्मण आणि उर्वरित महाराष्ट्रातील ब्राह्मण, दाखल्यावर कुणबी आणि फ्लेक्सवर कौंसात सरकार लावणारे मराठे, हल्ली आपल्या नावात सिंह लाऊन चंद्रगुप्त मौर्य धनगर होते म्हणणारे धनगर,हिंदू धर्माला पर्यायाने ब्राह्मणी कर्मठ आचारसंहितेला छेद देत लिंगायत आणि जैन हे दोन धर्म स्थापन झाले. पण, ह्यांचे धर्मगुरू कर्मकांडात शंकराचार्याना सुध्दा मागे टाकत आहेत, ओबीसी तर स्वतःला आम्ही ब्राह्मणांनपेक्षा एकच पायरी खाली आहोत याचा हवाला देत स्वतःलाच चिमटे काढत बसतात. आणि हे सर्वजण गरजेनुसार 'बहुजन' म्हणवून घेतात. राजकारणात तर अलीकडच्या मतदारसंघात स्वतःला बहुजन म्हणवून घेणारे पलीकडच्या मतदरसंघात "आम्ही ह्यांच्यात मोडत नाही ओ"!
तर ,अशा ह्या प्रासंगिक भूमिका आणि त्याच्यावर अवलंबून असलेले राजकारण.जसे तेंडुलकर म्हणतात, की माणूस वाईट नसतो तो झुंडीत गेला की त्याचा राक्षस होतो. तसचं काहीसं झालय या जाती व्यवस्थेचं. शेवटी काय रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर, भिडे गुरुजी यांसारखे लोक हाताशी घेऊन भाजपा आपली हिंदुत्ववादी भूमिका रेटत नेईल. प्रकाश आंबेडकर काँग्रेस ची स्पेस भरून काढायची म्हणून धर्माला जाती ने उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे नेहरूंनी घालून दिलेलं विज्ञान आणि सहजीवनाचं तत्व तसेच, बाबासाहेबांच शिका आणि संघटित व्हा हे तत्व त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे कसे चालवतील हेच बघणं  औत्सुक्याचं ठरेल.

प्रसाद जोशी
हुपरी.

Comments